शिवसेनेची पत्रकार परिषद कधी तरी ऐका – राऊत

मुंबई : शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना काय पोलखोल करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. शिवसेना खा. संजय राऊत यांनी तसे संकेतही दिले आहेत. या पत्रकार परिषदे आधी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेबाबत विचारणा केली असता. राऊत म्हणाले की, आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं होतं. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा. या, ऐका. कधी तरी शिवसेनेचं ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

राऊत यांना यावेळी ईडीकडून सुरु असलेल्या धाडीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, माझ्याकडे माहिती नाही. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण जास्त बोलू नये. कारवाई सुरु असेल तर राज्य आणि केंद्र सरकराने एकत्रित काम करायला हवं. असं राऊत म्हणाले.

यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं येत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मला माहिती नाही. नावं समोर येतील की घुसवली जातील हा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये मोठा प्रश्न आहे. पण त्याच्यावर मी आता बोलणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता हा नाजूक आणि गंभीर विषय असतो. तपास सुरु असताना त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही.

Share