मुंबईत लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांचे हाल

मुंबई : माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ काल रात्री झालेल्या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांच्या अपघातानंतर मुंबईतील उपनगरीय (लोकल) वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. लोकल सेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेशी निगडीत सर्व रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले.

काल शुक्रवारी रात्री माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने पुदुच्चेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. यामुळे जलद मार्गावरील रेल्वेमार्गाचे नुकसान झाले. या अपघातानंतर लोकलची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातानंतर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली असून, त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवरही झाला आहे. एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्याने स्लो गाड्यांचे वेळापत्रकदेखील कोलमडले आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पोलिस विभागाअंतर्गत आज पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी परीक्षा होत आहे. मात्र, लोकल रेल्वे सेवा कोलमडल्याने अनेक परीक्षार्थी उमेदवार वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. १५ ते २० मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही.

दरम्यान, या अपघातामुळे माटुंगा भागातील रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या असल्याने लोकलचे तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबई ते मनमाड आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या एकूण ७ गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत, तर मुंबईकडे येणाऱ्या चार गाड्या ठाणे, नाशिक रोड, पनवेल, मनमाड या ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत, तर दोन गाड्यांचे वेळापत्रक हे बदलण्यात आले आहे. दादर-माटुंगा दरम्यान रेल्वे अपघात झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव उपनगरीय रेल्वेची जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी बंद करण्यात आली होती. धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या पावणे दहा वाजता बंद करण्यात आल्या होत्या. आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या अपघातामुळे काल रात्रीपासून मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस,मनमाड-मुंबई समर स्पेशल, मुंबई- मनमाड समर स्पेशल, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/Central_Railway/status/1515141836805111809?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515141836805111809%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fthane%2Fthe-schedule-of-local-trains-of-central-railway-in-mumbai-has-completely-collapsed-heavy-crowd-at-railway-stations-beyond-thane-asj-82-2889973%2F

दरम्यान, मुलूंड ते कुर्ला अंतर पार करण्यासाठी दीड तास वेळ लागत आहे. सध्या मध्ये रेल्वेची वाहतूक सुपर स्लो झाली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ कर्जत/ कसारा) लोकल रविवार वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार आहे. गरज असल्यास पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.

Share