मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगत, शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्यानंतर आता केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया दिली आहे. ”आगे आगे देखो होता है क्या”, असे म्हणत लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या या वक्तव्याने नवीन चर्चांचा उधाण आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी झी परिषदेच्या व्यासपीठावरून संवाद साधताना महाराष्ट्रातील राजकीय संकटावर सूचक भाष्य केले. ते म्हणाले, मला वाटते की, महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकारणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत, संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते, असे गडकरी म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण करून ते म्हणाले की, सरकारे येतात आणि जातात, पंतप्रधान येत राहतात; पण हा देश राहिला पाहिजे. देशासाठी काम केले पाहिजे.
शिवसेना व भाजप एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच होईल
राज्यात शिवसेनेत सुरू असलेल्या बंडखोरीमागे भाजप असल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, मी राज्यातल्या राजकारणावर जास्त बोलणार नाही; पण एवढे नक्की सांगेन की, शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच होईल.
बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर प्रेम होते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत नितीन गडकरी म्हणाले, मी मंत्री असताना मला त्यांचे खूप सहकार्य लाभले होते. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम होते. मुंबईतील विकासकामांसाठी त्यांनी मला भरपूर मदत केली होती. मी तेव्हाही त्यांचा आदर करत होतो, आजही करतो. उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही त्यांच्या गोष्टी आहेत तर काही आमच्या. हे सुरूच राहणार आहे. भाजप आणि शिवसेना एकत्र आले तर मला आनंद होईल; पण आज ती परिस्थिती खूप लांब असल्याचे दिसत आहे. पुढे काय आहे हे देवालाच माहिती असेल. याचे उत्तर येणारा काळच देईल, असे नितीन गडकरी म्हणाले.