आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाहीत, आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत : आ. दीपक केसरकर

गुवाहाटी : आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत, हा गैरसमज आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही, आम्ही शिवसेनेचाच भाग आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज सांगितले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ८ असे एकूण ४६ आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. बंडखोर शिंदे गटाकडून गुवाहाटीमधून आज शनिवारी (२५ जून) ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी बंडखोर शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली. दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला २४ तासात मुंबईत येण्याचे आवाहन केले. मात्र, एकनाथ शिंदे आणि इतर आमदार मुंबईत आले नाहीत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईत कधी येणार, असा प्रश्न विचारला असता, आमदार दीपक केसरकर म्हणाले, जेव्हा आम्ही आमदार इकडे आलो तेव्हापासून महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आमची कार्यालये फोडली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले जात आहे. हे चुकीचे आहे. कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. खासदार संजय राऊतांचे बोलणे आम्ही गांभीर्याने घेत नाही, असेही ते म्हणाले.

आम्ही सेनेतच, वेगळी चर्चा करण्याची गरज नाही
आम्ही महाराष्ट्रातून इकडे आल्यानंतर माध्यमांशी खूप कमी बोललो. मला एकनाथ शिंदे यांनी तुम्ही माध्यमांशी अधिकृत बोला, असे सांगितले आहे. काही दिवसांपासून सर्वांचा एक गैरसमज आहे की, आम्ही शिवसेनेत आहे की नाही? आम्ही सेनेतच आहोत. त्यामुळे कोणी वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवले होते; पण…

यावेळी दीपक केसरकर यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आमदारांचे काही अधिकार असतात, मागण्या असतात.आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अनेक वेळा सुचवले होते की, ज्या युतीत आपण लढलो, त्यांच्याच सोबत राहूया. आपण आता सरकारमध्ये ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत राहू नये. कारण, आपल्या पक्षाची अधोगती होत आहे. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती; परंतु तरीदेखील त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. एवढे लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य असेल ना? उद्धव ठाकरे यांना हे समजायला हवे होते; पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमच्याच पक्षात आमच्या आमदारांना पक्षप्रमुखांना भेटता येत नव्हते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. संवाद नसला की, गैरसमज निर्माण होतात. एक गैरसमज असा, की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो; पण आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत.

ईडीच्या भीतीने नव्हे, तर प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदे यांच्यासोबत

केसरकर म्हणाले, कोणतीही गोष्ट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगितली की, ते विचार करायचे. राज्यात ईडीची कारवाई एक-दोन नेत्यांवर झाली आहे. सर्व नेत्यांवर नाही, त्यामुळे ईडीच्या भीतीने आम्ही भाजपची साथ देत आहोत ही माहिती चुकीची आहे. ईडी नव्हे प्रेमाच्या कमतरतेमुळे आम्ही शिंदे यांच्यासोबत आहोत. याआधीही आम्ही मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जाण्यासाठी सांगितले होते. मात्र, आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात नाही. शिवसेनेमुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्तेत आहेत आणि त्यांच्याकडे सगळी चांगली खाती आहेत आणि तेच शिवसेनेचे खच्चीकरण करत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आम्ही बहुमत सिद्ध करायला केव्हाही तयार आहोत
घटनात्मक तरतुदीनुसार दोन तृतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला, तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेले नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत, असे केसरकर यांनी सांगितले.

नोटिसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न
शिवसेनेने बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी केल्यावर आमच्यासोबत इकडे आलेल्या आमदारांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत, त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवार आणि रविवार गृहित धरून नोटिसा दिल्या आहेत. कायद्यानुसार आमच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही. जर असे होत असेल तर आम्ही कोर्टात दाद मागू. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार आहोत. आम्हाला विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस देताना नैसर्गिक न्यायाप्रमाणे ७ दिवसांची मुदत द्यायला हवी होती. आम्ही विधानसभा उपाध्यक्षांकडून ती वेळ वाढवून घेणार असल्याचे सांगून, आमचा गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. घटनात्मक अधिकार मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे केसरकर म्हणाले.

आमचा खर्च आम्हीच करतोय
तुम्ही सुरतमध्ये आणि त्यानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहता आहात तसेच खाजगी विमानाने प्रवास करत आहात याचा नेमका खर्च कोण करतेय, असा प्रश्न विचारला, तेव्हा यावर उत्तर देताना आमदार केसरकर म्हणाले, असेच प्रश्न वेगवेगळ्या राज्यात विचारला जातात. दुसऱ्या पक्षाचे आमदार जेव्हा हॉटेलात जातात तेव्हा साध्या हॉटेलात राहतात का? आमच्या आमदारांचा पगार चांगला आहे, आम्ही काहीच फुकट घेत नाहीत, पैसे देत आहोत आणि ऑफिशीअली देत आहोत. त्यांच्याकडून काय असेल ती सवलत घेतो; पण पैसे भरूनच आम्ही येथे राहतोय, फुकटात तर राहत नाहीत. कोणताही पक्ष आमचा खर्च करत नाही. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावले. त्यांनी सांगितले त्या विमानात आम्ही बसलो आणि येथे आलो. जे काही पेमेंट असेल ते करू, त्याचा काही प्रश्न नाही. तुम्ही परत का असे प्रश्न विचारत आहात. तुम्हाला का वाटतेय की, यामागे भाजप आहे, यामागे भाजप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share