देशमुख-मलिकांचा राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी अर्ज दाखल

मुंबई : राज्यसभा निवडणूकीमध्ये मतदान करण्यात यावे याकरीता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. येत्या ८ जुन रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायलायने दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदारांविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान ईडी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला जाण्यासाठी परवानगी देणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या अधिकाराचे भवितव्य आता ईडीच्या भूमिकेवर अवलंबून आहे, असे म्हणावे लागेल.

दरम्यान, महाविकास आघाडीने आज राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. महाविकास आघाडीच्या शिष्ठमंडळाने भाजप नेत्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण भाजपने वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतो, असं म्हटलं. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे भाजपने महाविकास आघाडीचा प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने प्रस्ताव नाकारल्याने राज्यसभा निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानास परवानगी मिळाली तर महाविकास आघाडीचं गणित साजेसं ठरु शकतं.

Share