मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसत होती. याच पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रथम मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. यापाठोपाठ राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारी पर्यत बंद करण्याचा आदेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र राज्यात आता कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्ण संख्येत मोठी घट होतांना दिसत आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थांकडून शाळा सुरु करण्याची मागणीला जोर धरत होती. याची दखल घेत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. आता या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता मिळाली असून २४ जानेवारी पासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे”.
“मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला जावा आणि त्यानुसारच निर्णय घेतला जावा,” असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.