राजपथावर महाराष्ट्राचा डंका!, चित्ररथ ‘पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत’

नवी दिल्लीः  प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिल बक्षिस मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाचा गौरव करण्यात आला आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे. यवतमाळच्या तरुणांनी साकारलेला हा चित्ररथ संपूर्ण देशवासियांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

महाराष्ट्राने राजपथावर राज्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवणारा चित्ररथ सादर केला होता. राज्यातील जैवविविधता आणि सुदेश भोसले यांच्या भारदस्त आवाजातील समालोचन त्यामुळे या चित्ररथाला नेटकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली होती. ऑनलाईन व्होटिंगमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंतीची मते मिळाली होती. त्यानंतर आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात महाराष्ट्राला पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षिस देण्यात आले आहे.

सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलीय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.

महाराष्ट्राच्या चित्ररथाने यंदा आगळावेगळा प्रयोग केला होता. महाराष्ट्राने ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. जणू काही संपूर्ण जंगल की दुनियाच या चित्ररथावर अवतरल्याचा भास होत होता. महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला होता. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची असून निर्मिती संचालक बिभीषण चावरे आहेत. त्यांच्या संकल्पनेतून ही जंगलची दुनिया चित्ररथावर साकारण्यात आली होती. तर, या चित्ररथाचं समालोचन बीग बी अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.

Share