नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

कणकवली-  संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यावर युक्तीवाद करत आज जिल्हा सत्र न्यायालयाने राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नितेश यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात कोठडीवर सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी नितेश यांची कसून चौकशी केली. तपासाचा भाग म्हणून पोलीस त्यांना गोव्यातही घेऊन गेले होते. तसेच राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली. परंतू नितेश राणेंच्या वकीलांनी युक्तीवाद करत पोलिस कोठडीची गरज नाही असे म्हंटले आहे.यात न्यायालयाने नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Share