महेंद्रसिंह धोनीचे टी-२० मध्ये अनोखे ‘द्विशतक’!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट विश्वात आणखी एक मोठा विक्रम केला आहे. यावेळी त्याने दिग्गज यष्टीरक्षकांना मागे टाकले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून २०० झेल घेणारा धोनी हा पहिला खेळाडू ठरला आहे. असा विक्रम करणाऱ्या माहीच्या जवळपासही इतर कुणीही यष्टीरक्षक नाही.

‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो फक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीने रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात झेल घेऊन टी-२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून २०० झेल घेण्याचा विक्रम नोंदवला. धोनीने ३४७ टी-२० सामन्यात २०० झेल घेतले असून, झेल घेण्याचे हे अनोखे द्विशतक त्याने पूर्ण केले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्धच्या सामन्यात धोनीने दोन झेल घेतले. यामध्ये त्याने प्रथम रोव्हमन पॉवेलला शिकार बनवले. यानंतर त्याने शार्दुल ठाकूरचा दुसरा झेल घेतला. यासह त्याने यष्टिरक्षक म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये झेल घेण्याचे द्विशतक पूर्ण केले. आतापर्यंत धोनीने यष्टिरक्षक म्हणून एकूण ३४७ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २०० झेल घेतले आहेत. धोनी हे सर्व सामने टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी खेळला आहे.

धोनीनंतर दिनेश कार्तिकचा नंबर
३४७ टी-२० सामन्यांमध्ये महेंद्रसिंह धोनीने झेल घेत एकूण २०० बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने ८४ स्टंपिंग केले आहेत. या विक्रमाच्या बाबतीत धोनीच्या जवळपासही कोणी नाही. त्याच्यानंतर भारताचा दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने यष्टिरक्षक म्हणून आतापर्यंत २९९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १८२ झेल घेतले आहेत. कार्तिकने ६१ स्टंपिंगसह एकूण २४३ विकेट घेतल्या आहेत.

टी-२० सामन्यांमध्ये कोणत्या यष्टिरक्षकाने किती झेल घेतले….

यष्टिरक्षक —देश — टी-२० सामने — झेल

  • महेंद्रसिंह धोनी : भारत : ३४७ : २००
  • दिनेश कार्तिक : भारत : २९९ : १८२
  • कामरान अकमल : पाकिस्तान : २८२ : १७२
  • क्विंटन डिकॉक : दक्षिण आफ्रिका : २२६ : १५०
Share