लोडशेडिंगचा असाही फटका! लाईट गेल्याने नवरींचीच अदलाबदल झाली…

भोपाळ : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात विजेची समस्या भेडसावत आहे. लोडशेडिंगमुळे लोकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील एका गावात लग्नसमारंभ सुरू असताना अचानक वीज गेली आणि अंधारात चक्क नवरींची अदलाबदल झाली. ही चूक कळताच नंतर खऱ्या जोडीदारासोबत सप्तपदी पूर्ण करण्यात आली. विजेअभावी अंधारात वधूची अदलाबदल झाल्याची ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय बनली आहे.

उज्जैन जिल्ह्यातील अस्लाना गावातील रमेशलाल यांच्या दोन मुली आणि एका मुलाचे रविवारी लग्न होते. रमेशलाल यांच्या मुली निकिता आणि करिश्मा यांचा विवाह उज्जैनजवळील डांगवाडा गावातील गणेश आणि भोला यांच्याशी पार पडला. नवरदेव आणि नवरीची गावातून वरात काढण्यात आली. वरात गावात फिरून आल्यानंतर रात्रीचे ११ वाजले होते. माता पूजन करताना दोन्ही नववधूंनी वरांचे हात धरून पूजा केली;परंतु याचवेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. माता पूजन करताना निकिताने गणेशचा तर करिश्मा हिने भोलाचा हात धरला होता; पण जेव्हा रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लाईट आली तेव्हा नवरींची अदलाबदल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

वधूच्या पोशाखात साम्य असल्याने अंधारात चक्क नवऱ्यांचीच अदलाबदल झाली. ही चूक लक्षात येताच वर आणि वराकडील मंडळी चक्रावून गेली. मग तोडगा काढण्यात आला. पहाटे पाच वाजता झालेल्या पूजेदरम्यान चूक दुरुस्त करीत खऱ्या वर आणि वरांना पुन्हा विधिवत सात फेरे घेण्यास सांगितले गेले आणि त्यांची सप्तपदी पूर्ण करण्यात आली. लाईटमुळे नवरींची अदलाबदल झाल्याची ही दुर्मिळ घटना आश्चर्याचा विषय बनली असून. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

Share