अमरावती : राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपमधील चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. दोन्ही बाजूकडून रणनीती आखली जात आहे. अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. असे असताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचे आ. रवी राणा यांनी म्हटले आहे.
राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होत आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर ६ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यात शिवसेना २, कॉँग्रेस १, राष्ट्रवादी कॉँग्रेस १ तर भाजप ३ जागा लढवत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही सहावी जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजप यांच्याकडून अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. हे राजकारण रंगात आले असताना आमदार रवी राणा यांनी अपक्ष आमदारांच्या बाबतीत गौप्यस्फोट केला आहे.
अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला हे पत्ते केवळ टाकायचे आहेत. मागच्या वेळी अपक्ष आमदारांनी मिळून अपक्ष खासदार संजय काकडे यांना निवडून दिले होते. संजय काकडे यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अपक्ष आमदारांनी मोठी ताकद लावली होती, त्यामध्ये मीही होतो. त्यामुळे यावेळी देखील अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला ते फक्त टाकायचे आहेत. अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत, असे आ. राणा यांनी म्हटले आहे.
अपक्ष आमदारांवर भाजपकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव : संजय राऊत
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्यांचे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे, अशा अपक्ष आमदारांवर भाजपकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने राज्यसभा निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिष दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणला जात आहे, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत, असे राऊत म्हणाले. या निवडणुकीत चारही जागा महाविकास आघाडी व्यवस्थित जिंकणार आहे. राज्यसभेची सहावी जागा महाविकास आघाडी जिंकणार, उगीच भाजपने त्यांचे पैसे वाया घालवू नयेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.