भाजपमध्ये माझे अनेक समर्थक आमदार; पण ते मला मतदान करतील असे वाटत नाही : खडसे

मुंबई : मी भाजपमध्ये असताना अनेकांना मदत केली आहे. कुणाला तिकीट देण्यासाठी, कुणाला मंत्रिपद देण्यासाठी तर कुणाला गरज लागेल तेव्हा मदत केली. त्यामुळे भारतीय जनता पक्षात माझे दोनच नाही तर अनेक समर्थक आमदार आहेत. अनेकजण माझ्या संपर्कात आहेत. भाजपचे ते आमदार माझे समर्थक असले तरी पक्ष सोडून ते मला मतदान करतील असे वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या सोमवारी (२० जून) मतदान होणार आहे. या १० जागांसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २, काँग्रेसचे २ आणि भाजपचे ५ असे एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे १० व्या जागेसाठी मोठी चुरस असणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी आता काही तास उरले असताना अजूनही अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. या निवडणुकीत अपक्ष तसेच छोट्या पक्षांच्या आमदारांच्या मतांना मोठे महत्त्व आले आहे. अपक्ष तसेच बहुजन विकास आघाडीची मते राज्यसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत. कालच भाजप नेते गिरीश महाजन आणि भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते व अपक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार एकनाथ खडसे यांनी आज रविवारी विरार येथे जाऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी या दोघा नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार माझ्यावर मनापासून प्रेम करतात; पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असल्याने पक्ष सोडून ते मला मतदान करतील, असे मला वाटत नाही. भलेही मी त्यांना तिकीट देण्यासाठी, कुणाला मंत्रिपद देण्यासाठी मदत केली असेल; परंतु त्यांनी अजून तरी मला मतदान करण्यासाठी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली नाही. कारण, प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असते. काही लोक माझ्या संपर्कात आहेत.

हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला मतदान करण्याचा शब्द दिला का? या पत्रकारांच्या प्रश्नावर खडसे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. यामुळेच मी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ठाकूर यांना मी शब्द मागायला आलो नव्हतो तर मत मागण्यासाठी आलो होतो. मत देण्याचा निर्णय शेवटी त्यांचा आहे. शब्द देणे वगैरे राजकारणात काही नवीन नाही; पण मत मागणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य वाटेल ते त्याप्रमाणे भूमिका घेतील, योग्य उमेदवाराला मतदान करतील, असे खडसे म्हणाले.

भाजप मला पाडण्याचा प्रयत्न करेल हे स्वाभाविकच
आपल्या विरोधकांच्या विरोधात मतदान झाले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये अशी आमची भूमिका आहे. या निवडणुकीत भाजप मला पाडण्याचा प्रयत्न करेल हे स्वाभाविकच आहे. हे सर्वांसाठी सारखेच आहे. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

Share