‘अग्निपथ’ योजना रद्द होणार नाही; लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ’ योजना रद्द होणार नसून लवकरच या योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच ही भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीनही सेना दलाच्या वतीने आज संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी ही माहिती दिली.

‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत येत्या २४ जूनपासून वायू दलात भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय लष्कराकडूनही लवकरच भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी केली जाईल. २०५० पर्यंत ५० टक्के लोकसंख्या ही ५० वर्षाच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणाऱ्या युवकांची गरज असल्याचे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशसेवेसाठी लढत असताना जर अग्निवीरांना प्राणाची आहुती द्यावी लागली तर त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. ‘अग्निवीर’ म्हणून कार्यरत असताना ते सियाचीनसारख्या भागात असतील तर सध्याच्या सैनिकांना जे भत्ते आणि सुविधा लागू आहेत, तेच त्यांनाही लागू राहणार आहेत. त्यांच्यासोबत सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

‘अग्निपथ’ योजना तरुणांसाठी फायदेशीर

‘अग्निपथ’ या योजनेचा उद्देश तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. ‘अग्निपथ’ योजना तरुणांसाठी फायदेशीर असून सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखे फायदे मिळणार आहेत. आजच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. निवृत्तीच्या प्रश्नावर पुरी म्हणाले, तिन्ही सैन्य दलातून दरवर्षी सुमारे १७ हजार ६०० सैनिक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार, असे त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे ही योजना तरुणांच्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून
यावेळी एअर मार्शल एस. के. झा म्हणाले, भारतीय हवाई दलात अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश करण्याची प्रक्रिया २४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, त्याअंतर्गत नोंदणी सुरू होईल. एक महिन्यानंतर म्हणजे २४ जुलैपासून पहिला टप्प्यातील अग्निवीरांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस ‘अग्निवीर’ ची पहिली तुकडी हवाई दलात दाखल होईल. या बॅचचे प्रशिक्षण ३० डिसेंबरपूर्वी सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नौदलासाठी भरती प्रक्रिया सुरू
नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल डी. के. त्रिपाठी म्हणाले, नौदलासाठी आमची भरती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. २५ जूनपर्यंत यासंदर्भातील जाहिरातीची माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू होऊन पहिला अग्निवीर २१ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण संस्थेत उपस्थित असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अग्निवीरांच्या वयोमर्यादेत वाढ
‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून होत असलेला वाढता विरोध पाहता केंद्र सरकारने या योजनेमध्ये बदल करीत अनेक तरतुदी जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्यात आली आहे. तसेच अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालय आणि कोस्ट कार्डमध्ये १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांमध्ये १० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय वायुसेनेने ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत भरतीसाठी तपशील जारी केला आहे. ‘अग्निपथ’ ही सशस्त्र दलांसाठी नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना आहे. या योजनेद्वारे समाविष्ट केलेल्या उमेदवारांना ‘अग्निवीर’ म्हणून संबोधले जाणार आहे. हवाई दल कायदा १९५० अंतर्गत चार वर्षांसाठी त्यांची भरती केली जाणार आहे. देशाच्या सर्व भागातून ‘अग्निवीर’ म्हणून उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ‘आयएएफ’ ने म्हटले आहे.

Share