मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने बॉलिवूडच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच ‘आयफा’ पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. अबू-धाबी येथे शनिवारी पार पडलेल्या ‘आयफा २०२२’ पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकर हिला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सई ताम्हणकरने हा पुरस्कार पटकावून बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठीचा झेंडा रोवला आहे.
सई ताम्हणकरला हा पुरस्कार ‘मिमी’ या चित्रपटातील ‘शमा’च्या भूमिकेसाठी मिळाला आहे. तिने या सिनेमात क्रिती सेनॉन अर्थात मिमीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. क्रिती सेनॉन, सई ताम्हणकरसह पंकज त्रिपाठी यांचीदेखील या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स आणि एडन व्हायटॉक हे कलाकार या सिनेमात सहाय्यक भूमिकेत आहेत. कॉमेडी आणि ड्रामा असलेला हा चित्रपट मागच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, रोहन शंकर यांनी सहलेखन केले आहे.
‘मिमी’ या चित्रपटात सरोगसी हा विषय हाताळण्यात आला आहे. या सिनेमाने प्रेक्षकांसह समीक्षकांकडून वाहवा मिळवली होती. यामध्ये अशी कहाणी दाखवण्यात आली आहे की, मिमी अर्थात क्रिती सेनन काही कारणास्तव एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते; पण त्यानंतर ते जोडपे तिला कोणताच प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे मिमी स्वत:ची स्वप्न बाजूला सारत त्या बाळाचा सांभाळ करते. मिमीच्या या संपूर्ण प्रवासात ‘शमा’ अर्थात सई ताम्हणकर हिने साकारलेले पात्र तिच्यासोबत असते. सईला याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान मिळवल्यानंतर तिचे विशेष कौतुक होत आहे. सोशल मीडियावर युजर्स तिचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट करत आहेत. मराठी सिनेसृष्टीतूनही सई ताम्हणकरचे अभिनंदन केले जात आहे.
https://www.instagram.com/p/CeWd620sSDH/?utm_source=ig_web_copy_link
यंदा ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्याचे २२ वे वर्ष होते. अबू धाबी येथे दिमाखात पार पडलेल्या
या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना ‘आयफा अवॉर्ड २०२२’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेहरशाह’ चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पटकावला. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णू वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर ‘मिमी’ या चित्रपटासाठी अभिनेती क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर सई ताम्हणकर हिला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
https://www.instagram.com/p/CeJNyrig2wJ/?utm_source=ig_web_copy_link
कोणकोण ठरले ‘आयफा अवॉर्ड २०२२’ चे मानकरी?
सर्वोत्कृष्ट चित्रपट –शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक –विष्णू वर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता –विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –क्रिती सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता –पंकज त्रिपाठी (ल्युडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री –सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता –अहान शेट्टी (अहान शेट्टी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री –शर्वरी वाघ (बंटी और बबली २)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक –जुबिन नौटियाल रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका –असीस कौर, रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत –ए. आर. रहमान (अतरंगी रे), तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोसे, बी प्राक, जानी (शेहरशाह)
या सोहळ्यात सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, विकी कौशल, हनी सिंग, संगीतकार ए. आर. रहमान, जेनिलिया डिसूझा, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.