प्रत्येक स्त्रीसाठी मासिक पाळी हा प्रजनन चक्राचा एक नैसर्गिक भाग आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी सामान्यपणे वयाच्या १० ते १५ व्या वर्षी सुरू होते आणि यौवन सुरू होण्याचे चिन्हे आहे. मासिक पाळीत होणाऱ्या बदलांविषयी भविष्यवाणी करणे अवघड आहे आणि त्यास सामोर जाणंही कठीण आहे. जर मासिक पाळी प्रत्येक महिन्यात समान कालावधीच्या अंतराने येत असेल तर ती नियमित मासिक पाळी मानली जाते. बदलती जीवनशैली, आहारातील बदल आणि मानसिक ताण- तणावामुळे स्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही, यामुळे वेळेवर मासिक पाळी येण्यासाठी उपाय करणे गरजेचे असते. त्यासाठी मासिक पाळी येण्याची लक्षणे, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी.
प्रत्येक महिन्यात स्त्रीच्या अंडाशयामधून एक स्त्री बीज, त्याच्या एका आवरणासहित परिपक्व होऊन गर्भाशयामध्ये येते. गर्भाशयामध्ये ठराविक कालावधीत स्त्रीबीजाचे पुरुषाच्या बीजासोबत (शुक्राणू सोबत) फलन झाले नाही, तर काही काळानंतर ते स्त्री बीज आणि त्याच्या सोबत असणारे कवच गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी शरीरातून बाहेर टाकले जाते. बाहेर टाकत असताना त्यासोबत रक्तस्राव देखील होतो. हा रक्तस्राव साधारणतः तीन ते पाच दिवस चालतो. ही सर्व प्रक्रिया महिन्यातून एकदा होते, त्यामुळे यास मासिक पाळी किंवा मासिक धर्म असे म्हणतात. साधारणपणे मासिक पाळीचे चक्र हे २८ ते ३५ दिवसांचे असते.
मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी उपाय
एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक चमचा ओवा आणि दोन चमचे किसून घेतलेले आले टाका. एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत मिश्रण उकळवा आणि चहा सारखे गरमच किंवा कोमट असताना प्या. सकाळी उठल्यानंतर हा उपाय केल्याने आपल्याला पुढील काही दिवसात पाळी येण्यास मदत होते.
कच्च्या पपईची भाजी किंवा रस बनवून पिल्याने मासिक धर्म नियमित होण्यास मदत मिळते.
एक ग्लास पाण्यात दालचिनी किंवा धने टाकून उकळून घेऊन रोज सकाळी अनुशापोटी आणि संध्याकाळी घेतल्याने मासिक पाळी येण्यास फायदा होतो.
दररोज आल्याचा चहा पिल्याने मासिक पाळी येण्यास मदत होते.
कांद्याचे छोटे छोटे तुकडे करून ते भाजून घ्यावे, त्यात थोडा गूळ आणि पाणी घालून त्याचे सूप बनवावे. हे सुप कोमट असतानाच त्याचे सेवन केल्यास निश्चितच मासिक पाळी येण्यास मदत होते.
एक चमचा हळद आणि एक चमचा गूळ घ्या, त्यात एक ग्लास पाणी किंवा दूध टाकून उकळून घ्या. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी याचे सेवन केल्याने पाळी येण्यास मदत होते. हा उपाय पाळी येण्याच्या दोन ते तीन दिवस आधी पासून सुरू करावा.
दररोज सकाळी उपाशीपोटी तीळ किंवा धने खाल्ल्याने मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होते.
एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक कापून घेतलेला कांदा आणि थोडा गूळ घालून ते मिश्रण पाच ते सात मिनिटे उकळून घ्यावे, नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. रोज सकाळी आणि संध्याकाळी हे मिश्रण कोमट करून मासिक पाळी येण्याच्या चार दिवस आधी आणि चार दिवस नंतर घ्यावे.
एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप टाकून ते पाणी रात्रभर ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घेऊन पिल्याने मासिक पाळी येण्यास मदत होते.
भेंडीच्या झाडाच्या पानांचा रस घ्या, त्यात गावरान गाईच्या दुधापासून तयार केलेले दही टाकून दररोज सकाळी त्याचे सेवन केल्याने मासिक पाळी येण्यास मदत होते.
पिंपळाच्या झाडाच्या वाळलेल्या पानांची पावडर करून दुधासोबत घेतल्याने मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते.
एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून ते मिश्रण रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घेऊन पिल्याने मासिक पाळी येण्यास फायदा होतो.
मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी
चांगल्या प्रतीचे आणि स्वच्छ असणारे सॅनिटरी नॅपकिन वापरावे. शक्य असल्यास मेंस्ट्रुअल कप चा देखील वापर करू शकता.
दर सहा तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावे. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो.
मासिक पाळी दरम्यान ती जागा कोरडी व स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य द्यावे. बुरशीजन्य रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी मासिक पाळी दरम्यान काळजी घ्यावी.
रक्तस्त्राव प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सॅनिटरी नॅपकिन चा वापर झाल्यावर ते इतरत्र कुठेही फेकू नये. त्याऐवजी ते पेपर मध्ये व्यवस्थित गुंडाळून त्याची विल्हेवाट लावावी.
मासिक पाळीच्या वेळेस अंगावरुन जाणारे पांढरे पाणी जर दह्या सारखे घट्ट, पिवळसर असून जर , त्यास दुर्गंधी येत असेल तर यावर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून उपचार घेतले पाहिजेत, कारण ही सगळी लक्षणे योनीमार्गात झालेला संसर्गाची असू शकतात. जी दिवसेंदिवस वाढून आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरतात.
ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळेस खूप त्रास होतो किंवा स्त्राव जास्त होतो. त्यांनी कुळीथ (हुलगे) याचे बेसन किंवा सूप बनवून सेवन करावे. त्यामुळे पाळीतील त्रास कमी होण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने शारीरिक त्रास/वेदना कमी होण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान संक्रमणाचा धोका जास्त असल्यामुळे शारीरिक संबंध टाळावेत.
मासिक पाळी दरम्यान शरीराला खूप थकवा जाणवत असल्याने शक्य तेवढा पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा.
रोज एक चमचा जिरे आणि थोडा मध एकत्र करून सेवन केल्याने देखील मासिक पाळी येण्यास मदत होते.