महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही भाजपने केलेय- पटोले

मुंबई : काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहील. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून भाजपमुक्तीचा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर, तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला यावेळी लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, आ. राजेश राठोड, आ. धिरज देशमुख यांच्यासह आदी उपस्थिती होते.
भारतीय जनता पक्षाने सत्तेत येताना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सत्तेत आल्यापासून भाजपाने संविधान संपवण्याचे काम सुरु केले आहे. तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचे पापही केले जात आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान केला जात आहे. भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून आज लातूरमधून भाजपमुक्तीची सुरुवात झाली असून आता हे वातावरण मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा. मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले पाहिजे यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन करत सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, स्व. विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात भक्कमपणे उभे केले. आज मोठ्या संख्येने भाजपासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यासाठी राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष करण्याकामी लातूर जिल्ह्याचा मोठा वाटा असेल.
Share