ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रकृती बरी नसल्याचे पार्थ चटर्जी यांनी म्हटलं आहे. यानंतर दोन डाॅक्टरांचा चमूही घटनास्थळी पोहोचला होता. याशिवास पार्थ यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरू होती. चॅटर्जी यांच्या घरावरही ईडीने छापा मारला. पण त्यात फारसे काही सापडले नाही. मात्र चौकशीदरम्यान चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्याघरावरही ईडीने छापा मारला असता त्यात २० कोटींहून अधिक रक्कम आणि महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यादरम्यान चॅटर्जी यांना ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तसेच उत्पन्नाचे स्त्रोतही दाखवण्यात आले नाही. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

काय आहे शिक्षक भरती घोटाळा?

पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. २०१६ मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share