‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज सोमवारी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर निशाणा साधत विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. अशातच भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार असल्याचा दावा केला असून, ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’, असे म्हटले आहे.

‘काळ आला होता भाऊ किंव्हा भाईवर, पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा,’ असे सूचक ट्वीट भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. खासदार डॉ. बोंडे यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल भाकित केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. खा.डॉ. बोंडे यांच्या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण, असा प्रश्न अनेकांना पडला असून, अनेकजण आपापल्या परीने खा. डॉ. बोंडे यांच्या ट्वीटचा अर्थ लावत आहेत.

दुसरीकडे विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी नऊ वाजता विधान भवनात मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खास योजना आखली आहे. तसा दावा या तिन्ही पक्षाचे नेते करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून महाविकास आघाडी तसेच भाजपकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. काहीही झाले तरी आमचेच पाच उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून केला जात आहे, तर दुसरीकडे निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा केला जात असताना भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’, असे सूचक ट्वीट केले आहे. त्यांचा रोख शिवसेनेवर असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. सध्यातरी प्रत्येक पक्ष आमचे सर्व उमेदवार विजयी होणार असा दावा करत आहेत. मात्र या लढतीमध्ये कोण सरस ठरणार हे निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.

Share