मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं अमित शाह यांचं अभिनंदन

मुंबई : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित अनेक संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे.

PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणाबाजीनंतर लिहिलेल्या पोस्टमध्येही अमित शाहांना टॅग केलं होतं. “दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली या संघटनेच्या लोकांना अटक झाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी अटकसत्र घडलं. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशारा राज यांनी या पोस्टमधून दिला होता. या पोस्टच्या काही दिवसांनंतरच केंद्रीय गृहमंत्रालयाने संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने राज यांनी ट्वीटरवरुन सामाधान व्यक्त केलं आहे.

Share