मनसेचे वसंत मोरे आणि संजय राऊतांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा गेल्या महिन्यात होती. यातच आज बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि वसंत मोरेंची भेट झाल्याने वसंत मोरे पक्षांतर करणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात एका लग्रात राऊत आले होते, याच लग्नात मोरेही उपस्थित होते. इथेच त्यांची भेट झाली. यावेळी राऊतांनी मोरेंच्या कामाचे कौतुक केले.  वसंत मोरे यांना नावाने नाही तर ‘तात्या’ म्हणून ओळखले जाते आणि याच नावाने राऊत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राऊत यांनी यावेळी मोरे यांच्याकडे आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत जागा कशा सुटल्या आहे, आरक्षण कसे आहे, याचीही विचारपूस केली. यावेळी जाता-जाता संजय राऊत यांनी भेटू असे म्हणत वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेत नाराज असलेले वसंत मोरे हातात शिवबंधन बांधणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Share