मोदी मोठे नेते, पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काम केलं नाही, असं नाही – रोहित पवार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत. त्यांच्या देशाच्या प्रगतीतही मोठा वाट आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही कामच केलं नाही असा त्याचा अर्थ होत नाही, अशात शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लागवला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, राज्यपाल महोदयांचा केवळ २५०-३५०वर्षापूर्वीचा इतिहास कच्चा असल्याचे वाटायचे पण त्यांचे कालचे वक्तव्य बघता मागील ७० वर्षातील इतिहासही कच्चा दिसतो. मोदी साहेब हे मोठे नेते असून देशाच्या प्रगतीत त्यांचा नक्कीच वाटा आहे. पण याचा अर्थ आधीच्या पंतप्रधानांनी काही केले नाही, असे नाही, या शब्दात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसेच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचेच योगदान असते असे नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून ‘आधी भारतीयांना किंमत नव्हती’ असे वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे.

काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?
आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा,परंपरांना लोक नावे ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही; हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता, अशा शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

Share