हिंगोली : हिंगोली ते नरसी नामदेव रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील माय-लेकाचा मृत्यू झाला. रविवारी (८ मे) मातृदिनीच रात्री ही घटना घडली. सावित्रीबाई जेजेराम झाडे (वय ४५ वर्षे) व ज्ञानेश्वर जेजेराम झाडे (वय २४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
सेनगाव तालुक्यातील खुडज येथील सावित्रीबाई व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर झाडे हे दोघे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी ( क्र.एम.एच.१४/जी.क्यू. ९४२९) वाहनावर हिंगोली तालुक्यातील केसापूर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात होते. ब्रह्मपुरी पाटीजवळ आले असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात सावित्रीबाई झाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर झाडे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.
दरम्यान, याच वेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सेनगाव येथे कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी तातडीने त्यांचे वाहन थांबवून जखमी ज्ञानेश्वर झाडे यांना स्वतःच्या गाडीमध्ये बसवून उपचारासाठी हिंगोली येथे पाठवले. ज्ञानेश्वरची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी नांदेड येथे उपचारासाठी हलविले जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नरसी नामदेव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, उपनिरीक्षक अशोक कांबळे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मातृदिनीच झालेल्या या घटनेमुळे खुडज गावावर शोककळा पसरली आहे.