श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील दिवसेंदिवस ढासाळत चाललेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ६ मेच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. देशात गंभीर होत चाललेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या विनंतीनंतर राजपक्षे राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात परदेशी चलनाची कमतरता आहे. अशातच मोठ्या प्रमाणात आयातीवर निर्भर असलेल्या श्रीलंकेला बाहेरून जीवनावश्यक वस्तू मागवण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देशात परदेशी चलनाची कमतरता असल्याने इतर देशातून इंधन खरेदी करणंही कठीण झालं आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. तसेच महागाईचाही जोर वाढला आहे. ज्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.

परकीय कर्जाचा डोंगर; महागाई प्रचंड वाढली
श्रीलंकेत महागाई प्रचंड वाढलेली आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने लोकांचे जगणे अवघड झाले आहे. परकीय कर्जाचा डोंगर, लॉकडाऊन, तीव्र महागाई, इंधन पुरवठ्यातील तुटवडा, परकीय चलन साठ्यात झालेली घसरण आणि चलनाचे अवमूल्यन यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम झाला आहे. श्रीलंकेला यावर्षी ७ अब्ज डॉलर परदेशी कर्जाची परतफेड करायची आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोरोना काळापूर्वीच संकटात सापडली होती. लॉकडाऊनमुळे त्यात आणखी भर पडली. त्याचा असंघटित क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. ज्यात सुमारे ६० टक्के कर्मचार्‍यांचा वाटा आहे.

कोरोनामुळे पर्यटन उद्योग कोलमडला
कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक उत्पन्‍नात मोलाचा वाटा असलेला पर्यटन उद्योग बुडालेला आहे. पर्यटन व्यवसायावर श्रीलंकेतील २५ लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. देशाच्या उत्पन्नात पर्यटनाचा १० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. यातून देशाला ५ अब्ज डॉलर (जवळपास ३७ हजार कोटी रुपये) परकीय चलन मिळते. कोरोनामुळे हा उद्योग पुरता कोलमडला आहे

Share