नागपूर मेट्रो स्टेशन ठरताहेत लँडमार्क, रोज ६० हजार नागरिकांचा प्रवास

नागपूर :  महामेट्रो दिवसेंदिवस नागपूरची जीवनवहिनी होत चालली असून दररोज सुमारे ६० हजार नागरिक या माझी मेट्रोने प्रवास करीत असतात. ही संख्या हळूहळू २ लक्ष प्रवाशांवर जाणार आहे. मेट्रो ही शहराची आवश्यकता असून प्रवाशांच्या वाढल्या संख्येने माझी मेट्रो शहराची जीवन वाहिनी होत आहे, असे महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग) अनिल कोकटे यांनी केले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने व महाआयटीच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित ‘बदलते नागपूर आणि वाहतूक व्यवस्थेत माझी मेट्रोची भूमिका’ या विषयावर वेबचर्चा संवादात ते बोलत होते. प्रारंभी जिल्हाधिकारी आर.विमला यांनी त्यांचे स्वागत केले.

महामेट्रोची नागपुरातील परिवहन व्यवस्थेत मोलाची भूमिका आहे. दररोज ६० हजार प्रवासी प्रवास करतांना त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या वाहना वरील खर्चात बचत होते. त्यासोबतच वातावरण प्रदूषणमुक्त राहते. नागपुरातील शुध्द वातावरणासाठी मेट्रोची निवड योगच असे ते म्हणाले. पूर्ण क्षमतेने मेट्रो कार्यरत झाल्यावर दोन लक्ष प्रवासी प्रवास करतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. ग्रीन सीटी संकल्पनेत वाहने कमी वापरली जाणे अपेक्षित आहे. याशिवाय ‘मेट्रो’ मध्ये सौर ऊर्जेचा ६० टक्के वापर केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

महामेट्रो नागपूरसह पुणे, नाशिक, ठाणे आराखडा तयार झाला तर औरंगाबाद येथील आराखडा तयार करण्यात येत आहे. राज्य शासनाची त्यास मंजूरी मिळाली असून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच तेथेही प्रकल्प काया्रन्वित होईल, असे ते म्हणाले. माझी मेट्रोमुळे नागपूर शहराचा सर्वांगिण विकास होणार आहे. ३८ किलोमीटर लांबी व ३८ मेट्रो स्टेशन कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे अंदाजे ३ लक्ष नागरिक या मेट्रोचा लाभ घेतील, असे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रोची सेवा सर्वांना मिळावी यावर आमचा भर असल्याचे सांगून ते म्हणाले की, मेट्रोमुळे अपघातात घट होत असून सुरक्षितेत वाढ झाली आहे. त्यासोबतच महागाईच्या काळात माझी मेट्रो सामान्य नागरिकांना परडणारी आहे. दर दिड मिनीटाला एक याप्रमाणे मेट्रो सोडण्याचाही आमचा प्रयत्न आहे. महामेट्रोचे जाळे संपूर्ण नागपुरात परविणार आहोत. दोन ‘अर्बन फारेस्ट’ मेट्रोने शहरात उभारले आहेत. मेट्रो स्टेशन भविष्यात नागपुरातील लँडमार्क ठरणार आहेत. नागरिकांसाठी महाकार्डच्या व्यवस्थेमुळे डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यासोबत ऑटो, महापालिका बस यांच्याशी फिडर सर्व्हिसमुळे नागरिकांना सुविधा प्राप्त होणार आहे. कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. त्यासोबतच कमर्शियल डेव्हलपमेंट सुध्दा चालू आहे. तिकीटाव्यतिरिक्त पैसा यावा हा यामागील उद्देश आहे. महामेट्रोत सौर उर्जेची संकल्पना राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. माझी मेट्रो नागरिकांना माझी वाटली पाहिजे त्यादृष्टीकोनातून मेट्रोची वाटचाल सूरु असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.

Share