मुंबई- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला कुठल्याही प्रकारची जात पडताळणी करण्याचा अधिकार नाही. ते अधिकार सुप्रीम कोर्टाचा आदेश मिळाल्यानंतर प्रत्येक राज्यात कायदा करून जिल्हा जात पडताळणी समितीला मिळाले आहेत. ज्यांना हा अधिकार दिला नाही ते समीर वानखेडेंना क्लीन चिट देत आहेत, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत . तसेच मागासवर्गीय आयोगाबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मलिक म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जात पडताळणीचा अधिकार त्या-त्या राज्यांतील जिल्हा जात पडताळणी समितीला देण्यात आला आहेत. त्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देखील समितीलाच दिला आहे. ज्यांना हा अधिकार दिला नाही ते क्लीन चिट देत आहेत. यानिमित्ताने इतर संस्थांचे अधिकार हिसकावून घेण्याचं काम राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडून सुरू आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे आदेश मागासवर्गीय आयोगाने दिले आहेत अशा बातम्या सुरू आहेत. मात्र जे आदेश देण्यात आले आहेत त्यामध्ये माझं नाव नाही. येत्या काही दिवसात या संपूर्ण प्रकरणात मी कायदेशीर सल्ला घेऊन कोणाच्या बाबतीत काय कारवाई करायची याबाबत निश्चिती करून सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे आणि मागासवर्गीय आयोगाबाबतची आपली भूमिका जाहीर करणार आहे असं मलिक पत्रकार परिषदे दरम्यान म्हंटले आहे.