नवज्योतसिंग सिद्धू यांचे पटियाला जिल्हा न्यायालयात आत्मसमर्पण

चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना ३४ वर्षे जुन्या ‘रोड रेज’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी (१९ मे) सुनावली होती. न्यायालयाच्या या निकालानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली.

१९८८ मधील या खटल्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धूला आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र, सिद्धूंनी शुक्रवारी दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धू याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सिद्धू यांच्यासाठी आठवडाभराची मुदत मागितली होती. मात्र, ती मंजूर न झाल्याने सिद्धू शरण आले. शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास पटियालातील माता कौशल्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

वकिलाने सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवडे वाढवण्याच्या विनंतीला विरोध केला होता. ३४ वर्षे झाले म्हणजे गुन्हा मरतो असे होत नाही. आता निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा ३ ते ४ आठवड्यांची आवश्यकता आहे. मात्र, वेळ देण्याबाबत विचार करणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, असे वकिलांनी सांगितले. न्यायमूर्ती खानविलकर यांनी सिद्धूच्या वकिलाला अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि खंडपीठाच्या स्थापनेसाठी सीजेआयसमोर नमूद केले. मात्र, आत्मसमर्पणाला मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच सिद्धू शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात आत्मसमर्पण करणार असल्याची बातमी आली होती. शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे काही नेते आणि समर्थक नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

नेमके प्रकरण काय?
२७ डिसेंबर १९८८ च्या संध्याकाळी नवज्योतसिंग सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियाला येथील शेरावले गेटच्या बाजारात गेले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून दीड कि.मी. अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून ६५ वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली आहे.

यापूर्वी १६ मे २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक हजार रुपयांचा दंड भरून त्यांची सुटका केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मृताच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाप्रमाणे सिद्धूला कलम ३०४ अंतर्गत शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आणि यावर आपला निर्णय बदलवत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना शिक्षा सुनावली आहे.

Share