शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगाबाहेर

मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी इंद्राणी मुखर्जी भायखळा तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. साडेसहा वर्षानंतर पहिल्यांदाच इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगाच्या बाहेर पाऊल ठेवले. यावेळी इंद्राणी मुखर्जीची छबी टिपण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. इंद्राणी मुखर्जीने तुरुंगाच्या बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहून स्मितहास्य केले.

खटला लवकर संपण्याची शक्यता नसताना सुमारे साडेसहा वर्षांचा तुरुंगवास झाला आहे, या कारणाखाली सर्वोच्च न्यायालयाने शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या जामिनावरील सुटकेचा आदेश काढला. त्यानुसार दोन लाख रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर त्यांची भायखळा तुरुंगातून सुटका झाली. मला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया इंद्राणी मुखर्जी यांनी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना दिली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणी मुखर्जी त्यांच्या वकिलांसोबत आपल्या मर्सिडीज कारमधून घराकडे रवाना झाल्या.

या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने ज्या अटींवर जामीन मंजूर केला. त्याच अटींवर इंद्राणीला जामीन मंजूर करण्यात यावा आणि सीबीआय न्यायालयाने त्या अटी निश्चित कराव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते. त्याप्रमाणे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी गुरुवारी हा सशर्त जामीन आदेश काढला.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातल्या या अटी
सीबीआय न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जायचे नाही, तसेच पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा अशा प्रमुख अटी इंद्राणी यांना घालण्यात आल्या आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर स्वत:चा निवासी पत्ता व संपर्क क्रमांकाचा सर्व तपशील सीबीआयला द्यायचा आणि त्यात बदल झाला तरी तो कळवायचा, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच, सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशी अटही घालण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे हजेरी लावणेही इंद्राणी यांच्यासाठी अनिवार्य आहे.

नेमके प्रकरण काय?
गेल्या २०१५ ला पेण (जि. रायगड) येथील जंगलात एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची फॉरेन्सिंक चाचणी केली असता हा मृतदेह शीना बोरा हिचा असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते; पण ही हत्या २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीसह तिच्या गाडीचा चालक आणि आणखी काही जणांना अटक केली होती. पोलिसांनी तपास केला असता, इंद्राणीने मुखर्जीने आपल्या मुलीचा दुसऱ्या पतीच्या मदतीने खून केला असल्याचे समोर आले होते. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी होती. या हत्येच्या कटात तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि वाहनचालक शामवर राय यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. या हत्येबद्दल माहिती असल्याचा आरोप तिचा तिसऱ्या नवऱ्यावर म्हणजे पीटर मुखर्जीवर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने पीटरची सुटका यापूर्वीच केली आहे. तेव्हापासून इंद्राणी मुखर्जी भायखळा तुरुंगात होती. वैद्यकीय कारणांमुळे तिने उच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी नामंजूर झाल्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीना बुधवारी जामीन मंजूर केला आहे.

Share