सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद

नौपाडा (ओडिशा) : छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील नौपाडा जिल्ह्यात आज मंगळवारी केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. मृतांमध्ये दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे जवान रस्त्याचे काम करणाऱ्या लोकांना सुरक्षा देत असताना अचानक नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.

 

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (२१ जून) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफच्या जवानांचे पथक ओडिशा राज्यातील नौपाडा जिल्ह्यात रस्ते बांधणीचे काम करीत असलेल्या लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी निघाले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुधारित आणि क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहाय्यक उपनिरीक्षक शिशुपाल सिंग, शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

यापूर्वी छत्तीसगड राज्यात वर्षभरापूर्वी विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये २२ जवान शहीद झाले होते. त्यानंतर २०० ते ३०० नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवादी कमांडर हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गेले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी तीन बाजूंनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला व रॉकेट लाँचरही सोडले होते. तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

मध्य प्रदेशात तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
दरम्यान, सोमवारी (२० जून) मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या तिघांवरही एकूण ३० लाखांहून अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलेचाही समावेश होता.

Share