मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देखमुखांना जामीन मिळाला होता, मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. पण आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.
Rs 100 crores extortion scam | Former Maharashtra minister Anil Deshmukh's bail plea rejected by CBI court
— ANI (@ANI) October 21, 2022
अनिल देशमुखांविरोधात आरोप काय?
अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.
ईडीच्या आरोपांनुसार, सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.