‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहाचा नवा लूक चर्चेत

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे हा यशवर्धन चौधरी तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामतची भूमिका साकारत आहेत. सध्या या मालिकेतील सर्वाधिक चर्चा झालेला यशवर्धन चौधरी आणि नेहा कामत यांच्या लग्नाचा एपिसोड नुकताच पार पडला. आता नेहा आणि यशच्या नव्या नात्याला लवकरच सुरुवात होणार आहे. नुकताच प्रार्थना बेहरेचा या मालिकेतील नवा लूक समोर आला आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर, मायरा वायकुळ (परी) यांच्यासह सर्व कलाकारांमुळे या मालिकेला चार चांद लागले आहेत. विशेषत: लहानग्या ‘परी’ ची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ हिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

प्रार्थना बेहरेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकतेच तिने नेहाच्या व्यक्तिरेखेतील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात प्रार्थना ही छान तयार होताना दिसत आहे. एक हेअर ड्रेसर तिचे केस सेट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी नेहाने छान डिझायनर साडीही परिधान केली आहे. यात ती छान नटून थटून तयारी करत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत नेहा ही मंगळसूत्र, बांगड्यांकडे बघत असल्याचे दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरून ती नेहा चौधरीची भूमिका एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. या दोन्हीही व्हिडीओला ‘नेहाचे नवीन रुप…’, असे कॅप्शन प्रार्थना बेहरेने दिले आहे.

https://www.instagram.com/tv/Ce5IrVTAPF8/?utm_source=ig_web_copy_link

सध्या या मालिकेत सुखद गोष्टी पाहायला मिळत आहेत. नेहा आणि यशचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले आहे. त्यांच्या लग्नातील सर्व विधीही मोठ्या थाटामाटात करण्यात आले. यामुळे पॅलेसमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, यापुढे या मालिकेत काय होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या ट्विस्टमुळे या मालिकेविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

https://www.instagram.com/reel/Ce5avQGADbW/?utm_source=ig_web_copy_link

नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एंट्री

यश आणि नेहा यांच्या ‘विवाह स्पेशल’ एपिसोडमध्ये दोन तासाच्या भागात या जोडप्याचे लग्न दाखवण्यात आले. या भागात दाखवण्यात आलेल्या नव्या पात्रामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हे पात्र कोण आहे? कोण साकारणार आहे? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते. आता या सर्व प्रश्नांचा उलगडा झाला आहे. जेव्हा या पात्राची एंट्री दाखवण्यात आली होती, तेव्हाच प्रेक्षकांनी अंदाज बांधला होता की, हा नेहाचा पहिला नवरा असणार आहे. नेहाच्या पहिल्या नवऱ्याचे पात्र कोण साकारणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

अभिनेता निखिल राजेशिर्के हा नेहाचा पहिला नवरा अविनाथ ही भूमिका साकारत आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये सुजय दाते ही भूमिका साकारलेला निखिल राजेशिर्के हा आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये देखील दिसणार आहे. निखिलने विविध मालिका, नाटकांमध्ये दमदार अभिनय केला आहे. तो लवकरच ‘७ दोन ७५’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लगोरी, अजूनही बरसात आहे, छोटी मालकीण या मालिकांमध्येदेखील त्याने काम केले आहे. ‘मुव्हींग आउट’ या वेब सीरिजमध्ये निखिलने अभिज्ञा भावेसोबत काम केले होते.

परी, नेहा आणि यशच्या आयुष्यात नवे वादळ
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये निखिल राजेशिर्के हा ‘अविनाश’ ही भूमिका साकारताना दिसत आहे. ‘झी मराठी’ने त्याच्या एंट्रीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये अविनाशचा नेहाविरोधात काय प्लॅन असणार आहे हे समजते. तो परीचा ड्रायव्हर म्हणून चौधरींच्या पॅलेसवर एंट्री करतो. यावेळी तो असे म्हणतो की, ‘नेहा तू माझी पत्नी नसलीस तरी काय झालं, परी माझी मुलगी आहे गं’. परी-नेहा आणि यश यांच्या आयुष्यात अविनाश नावाचे वादळ आल्यानंतर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचे कथानक काय वळण घेते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Share