‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये राखी विजन साकारणार दयाबेनची भूमिका

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेत दयाबेन अर्थात दिशा वकानी दिसत नाही. आता या मालिकेत दयाबेन हे पात्र पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. अभिनेत्री राखी विजन ही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणार आहे.

राखी विजन म्हणजे ९० च्या दशकात तुफान लोकप्रिय झालेल्या ‘हम पाँच’ मालिकेतील स्वीटी माथुर. ‘झी टीव्ही’ वरील ‘हम पाँच’ या मालिकेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, शोमा आनंद, राखी विजन यांची या मालिकेत प्रमुख भूमिका होती. बऱ्याच दिवसांनंतर अभिनेत्री राखी विजन ही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत येणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे; परंतु या मालिकेतील एकेक पात्र मालिका सोडून जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेत दयाबेन अर्थात दिशा वकानी दिसत नाही. दिशा वकानी ही २०१७ मध्ये बाळंतपणासाठी गेली. मात्र, त्यानंतर ती या मालिकेत परतलीच नाही. प्रेक्षकांना तिची तीव्रतेने आठवण येत आहे. ती परतेल अशी आशा त्यांना होती; परंतु काही दिवसांपूर्वी दिशा वकानी ही पुन्हा आई झाली आहे. त्यामुळे ती पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत येण्याची शक्यता सध्या तरी धुसर आहे.

या मालिकेच्या निर्मात्यांनी आता या मालिकेत नवीन दयाबेन आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मालिकेच्या निर्मात्यांचा आता दयाबेनचा शोध संपला आहे. निर्मात्यांनी ‘दयाबेन’ या भूमिकेसाठी काही अभिनेत्रींच्या ऑडिशन्स घेतल्या आहेत. त्यातून अभिनेत्री राखी विजनला दयाबेनच्या पात्रासाठी करारबद्ध केल्याची बातमी समोर आली आहे. राखी विजनबद्दल बोलायच झाले तर राखी एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचे कॉमेडीचे टायमिंग जबरदस्त आहे. याआधीही राखीने ‘देख भाई देख’, ‘बनेगी अपनी बात’ आणि ‘नागिन ४’ यासारख्या मालिका केल्या आहेत. याशिवाय राखी ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटातही झळकली होती. ‘बिग बॉस २’ च्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती.

https://www.instagram.com/p/B8JLsxlBlOB/?utm_source=ig_web_copy_link

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे निर्माते असीत कुमार मोदी यांच्या म्हणण्यानुसार, आगामी काही महिन्यांत दयाबेन हे पात्र ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये पुनरागमन करेल. मालिकेत दयाबेनचे पात्र खूपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिच्या पुनरागमनासाठी कथानकात काही बदल करावे लागणार आहेत. तसेच तिचे पुनरागमन दणक्यात करायचे आहे. त्यामुळे यासाठी काही दिवस जातील. एका रात्रीत असा बदल करता येणार नाही, असे असीत कुमार मोदी यांनी सांगितले.

Share