‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री; आता मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असल्याचे या मालिकेच्या टीआरपीवरून दिसत आहे. या मालिकेतील पात्रही चाहत्यांच्या पसंतीस उतरली असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेतील कार्तिकी आणि दीपिका हे बालकलाकार चर्चेचा विषय ठरले आहेत. यापैकी कार्तिकीची भूमिका करणारी साईशा भोईर हिने ही मालिका सोडली असून, तिच्या जागी आता नवी साईशा दिसणार आहे. साईशा भोईरऐवजी आता मैत्रेयी दाते ही बालकलाकार या मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही भूमिका करणाऱ्या बालकलाकार सोशल मीडियावर चर्चेत असतात. यापैकी कार्तिकीची भूमिका करणारी साईशा भोईर ही या मालिकेत येण्यापूर्वी सोशल मीडिया स्टार होती. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘चिंटुकली साईशा’ म्हणून ती इस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. दरम्यान, आता साईशा भोईरने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेला रामराम ठोकला आहे. साईशाने ही मालिका सोडल्यामुळे तिचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.

https://www.instagram.com/p/CfBZs5dJofb/?utm_source=ig_web_copy_link

साईशा भोईरने ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सोडल्यामुळे आता या मालिकेत मैत्रेयी दाते ही बालकलाकार कार्तिकीची भूमिका साकारणार आहे. दोन वेण्या आणि फ्लॉरल फ्रॉक अशा कार्तिकीच्या गेटअपमधील मैत्रेयीचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये मैत्रेयी दीपिका अर्थात स्पृहा दळीसह पोज देताना दिसत आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. दीपा आणि कार्तिक यांच्यामधील तणाव सध्या वाढला असून, दीपा त्याला मंगळसूत्रदेखील परत करते, असे अलीकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोतून समोर आले आहे. अशावेळी दीपिका आणि कार्तिकी यांच्याभोवतीही बऱ्याचदा मालिकेचे कथानक फिरताना दिसते. त्यामुळे साईशाने मालिका सोडल्यानंतर कोण कार्तिकी साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता कार्तिकीची भूमिका मैत्रेयी दाते साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मैत्रेयी दाते हिने याआधी काही जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केले आहे. स्पृहा दळी आणि मैत्रेयी दातेचे फोटो पाहता मालिकेच्या सेटवर या दोघींची सुरुवातीपासूनच गट्टी जमल्याचे दिसून येत आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी हिने साकारली आहे. सध्या स्पृहा दळी पहिल्या इयत्तेचे धडे गिरवत आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती, त्यात तिचे सिलेक्शन झाले होते. ही स्पृहाची पहिलीच मालिका आहे. दीपिकाच्या भूमिकेमुळे स्पृहाला चांगली लोकप्रियता मिळाली आहे.

स्पृहा दळी ही स्टार किड्स म्हणून ओळखली जाते. मराठी मालिका अभिनेत्री वेदश्री विनय दळी हिची ती मुलगी आहे. वेदश्री दळी यांनी मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका वेदश्री दळी यांनी साकारली होती. याशिवाय ‘झी मराठी’वर गाजलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाई यांची भूमिका त्यांनी साकारली होती. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत वेदश्री दळी प्रणालीची भूमिका साकारताना दिसत आहेत.

Share