चुकीला माफी नाही! ‘दगडी चाळ २’ चा टिझर प्रदर्शित

मुंबई : सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘दगडी चाळ २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

‘दगडी चाळ’ चित्रपटाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांच्यासह अंकुश चौधरी आणि पूजा सावंत मेन लीडमध्ये झळकले होते. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘दगडी चाळ २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका आहे. ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये तुफान पावसात आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एंट्री पाहायला मिळत आहे.

डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाला, काटक शरीरयष्टी, या शहराच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले. मात्र, तो मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या ‘दगडी चाळ’मधील ‘चुकीला माफी नाही’, असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला.

सोशल मीडियाद्वारे ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करतानाच चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेचीदेखील घोषणा करण्यात आली असून, हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित ‘दगडी चाळ २’ चे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे.

संगीता अहिर यांनी यापूर्वी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी ‘दगडी चाळ’च्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या ‘दगडी चाळ’चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. चित्रपटाच्या घोषणेबद्दल निर्मात्या संगीता अहिर म्हणतात, आज आम्हाला ‘दगडी चाळ २’च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. ‘दगडी चाळ’ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी जगभर रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.” आता ‘दगडी चाळ २’ मध्ये प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share