एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर व्हायरल होतोय ‘धर्मवीर’चा व्हिडीओ

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीनंतर काल मध्यरात्रीपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे काही नाराज आमदारसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात वेगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर ‘धर्मवीर’ या चित्रपटातील एक व्हिडीओ मीम स्वरुपात एडिट करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘धर्मवीर’ या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक या अभिनेत्याच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘कुठे आहे एकनाथ?’ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हाच डायलॉग वापरून त्यापुढे एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ असण्यापासून ते महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य काय असणार, यासंदर्भात अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल २० आमदार फोडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त धक्का दिला. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले खरे; पण आमदार फुटल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला.

राज्यसभेपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीत फडणवीस यांनी अचूक नियोजन करीत काँग्रेस, शिवसेना व अपक्ष असे तब्बल २० आमदार फोडून भाजपचे पाचही उमेदवार निवडून आणले. विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील असंतोषाचा फायदा घेत चमत्कार घडवला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे काही मीम्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर महाविकास आघाडी समर्थक आणि भाजप समर्थक यांच्यामध्ये ट्विटर वॉरदेखील पाहायला मिळत आहे.

 

Share