२२ दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही ऊर्जामंत्र्यांची माहिती

नाशिक : जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व विजेची मागणी वाढली आहे. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात मागील २२ दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी गावात विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी नितीन राऊत बोलत होते.

शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे प्लॅन केले आहेत. केंद्राने कोळशाचे नियोजन व्यवस्थित केले नाही. मालगाड्या सुरू केल्या तरी व्यवस्थित पुरवठा होत नाही. देशातील इतर १२-१३ राज्यात लोडशेडिंग आहे. परंतु, राज्यात आता लोडशेडिंग नाही ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे मत मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक मंत्रालयाची लाईट गेली होती. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, मुंबई किंवा मंत्रालय या ठिकाणी महावितरण काम करत नाही. तेथे टाटा, बेस्ट आणि अदानी या कंपन्या काम करतात. मंत्रालयाचा परिसर बेस्टमध्ये येते. आमच्या नियंत्रणाखाली तो भाग येत नसल्यामुळे आम्ही त्याची चौकशी करू शकत नाही.

Share