औरंगाबाद : उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वीच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी नोटीसा बजावल्या आहेत. पाणी प्रश्नावरून भाजपकडून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी २० ते २५ पदाधिकाऱ्यांना १११ प्रमाणे कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये चुकीची भाषा वापरल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच ही नोटीस आल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहे. ‘ही तर लाचार सेनेची लाचारी’ असल्याचे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पाणी प्रश्नावरून ४ एप्रिलला भाजपने चिष्तिया कॉलनीच्या जलकुंभावर आंदोलन केले होते. मात्र तेथे मनपाचे कोणतेही वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारायला आले नव्हते. यामुळे संतप्त आंदोलक मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या दिल्लीगेट येथील ‘जलश्री’ या शासकीय निवासस्थानावर धडकले होते. व त्यांच्या घराबाहेर ठिय्या देत आंदोलन केले होते. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या प्रकरणाचा संदर्भदेत पोलिसांनी भाजप पदाधिकारीना मोबाइलवर नोटीस पाठवल्या आणि आज हजर राहण्यास सांगितले होते.
नोटीसमध्ये असा आहे उल्लेख..
तुम्ही आडदांड व कोणतीही परवानगी नसताना अडथळा निर्माण करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याचे स्वभावाचे दिसून येत असून आगामी काळात तुमच्याकडून सदर कारणावरून वाद होऊन त्यातून एखादा शरीरा विरुद्धचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वाटते वगैरे रिपोर्टमध्ये नमूद आहे. यावरून तुम्ही वरील प्रमाणे कृत्य केल्याबाबत आमची खात्री झाली आहे. तुमचेकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून त्यातून तुम्ही राहात असलेल्या भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होईल, असे आमचे मत झाले आहे. त्यामुळे तुम्हास हमीदारा शिवाय मोकळे सोडणे उचित वाटत नाही, असे पोलिसांच्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. यावरच भाजप पदाधिकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
हे तर जनतेच्या पाणी प्रश्नाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – जिल्हाध्यक्ष संजय केनेकर
या नोटीसमध्ये पोलीसांनी चुकीची भाषा वापरल्याचा आरोप संजय केनेकर यांनी केला आहे. सेनेच्या दबावाखाली पोलीसांनी कितीही नोटीसा पाठवल्या तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत. आमच्यावर कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच आम्हाला नोटीसा पाठवून जनतेच्या पाणी प्रश्नाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. असे ते म्हणाले.