आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी -संदीप देशपांडे

मुंबई : जेम्स लेनच्या छ्त्रपती शिवाजी महाराजांवरील ‘त्या’ वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २००३ साली ऑक्सफर्ड प्रकाशनाला लिहिलेले पत्र मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांसमोर आणले आहे. यावरून शरद पवार यांना हे पत्र आणि पुरंदरेंची भूमिका माहिती नव्हती का, असा सवाल विचारून शरद पवारांनी माफी मागावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या ‘उत्तर’ सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि या पक्षातील प्रमुख नेत्यांवर टीकेची तोफ डागली होती. या टीकेनंतर खुद्द शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेनचे पुस्तक आणि जातीपातीचे राजकारण यासंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. ठाण्यातील ‘उत्तर’ सभेत बोलताना राज ठाकरे यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख करत शरद पवारांवर जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या या आरोपाला उत्तर देताना, जेम्स लेनला पुस्तक लिहायला बाबासाहेब पुरंदरेंनी मदत केल्याच्या कथित आरोपाचे पवारांनी समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेले एक पत्रच मनसेने जाहीर करत पुरंदरेंवरील आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?
जेम्स लेनसंदर्भात राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत, जेम्स लेनने केलेल्या लिखाणात त्याचा आधार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंकडून ही माहिती घेतली, असे म्हटले होते. एखाद्या लेखकाने गलिच्छ प्रकारचे लिखाण केले आणि त्याला माहिती देण्याचे काम पुरंदरेंनी केले. त्याचा खुलासा पुरंदरेंनी कधी केला नाही. म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी केली असेल, तर मला त्याचे दु:ख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे याबाबत कुणी काय म्हटले असेल, तर मला त्याबद्दल फारसे बोलायचे नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान, यावर आता मनसेकडून बाबासाहेब पुरंदरे यांनी १० नोव्हेंबर २००३ रोजी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला लिहिलेले एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे पत्र समोर आणले असून, त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. काल शरद पवार म्हणाले होते की, बाबासाहेब पुरंदरेंनी याबाबत कुठेही काही म्हटले नाही, त्यावर हे पत्र स्वयंस्पष्ट आहे. त्यांच्या भावना या पत्रात बाबासाहेबांनी व्यक्त केल्या आहेत. या पत्राची कल्पना १०० टक्के राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. तरीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला गेला. राज ठाकरे भाषणात जे म्हणाले की, राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले आहे, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही, असे देशपांडे म्हणाले. नोव्हेंबर २००३ मध्ये बाबासाहेब पुरंदरेंनी दिल्लीतील ऑक्सफर्ड प्रकाशनाला हे पत्र लिहिले होते. या पत्रावर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सहा मान्यवरांच्या सह्या आहेत. यामध्ये निनाद बेडेकर, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. जी. बी. मेहेंदळे, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. जयसिंग पवार आणि तत्कालीन खासदार प्रदीप रावत यांच्या सह्या आहेत, असे देशपांडे यांनी सांगितले.

काय लिहिलंय या पत्रात?
एका शिवप्रेमीने आपल्याला हे पत्र पाठवल्याचे सांगून संदीप देशपांडे यांनी या पत्रात नमूद करण्यात आलेला मजकूरदेखील वाचून दाखवला. ”ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचे प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केले आहे. हे पुस्तक तुमच्याकडून प्रकाशित होत आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांविषयी जेम्स लेनने जे विधान केलय, ती त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीची उत्पत्ती आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी २५ नोव्हेंबर २००३ पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागे घ्यावे. जर प्रकाशक आणि लेखकाने असे काही केले नाही, तर भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू,” असे या पत्रातून बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहासकारांनी ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला सांगितल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. शरद पवार यांनी म्हटले होते की, माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावे. जर त्यांना वाटले की, चूक झाली आहे, तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागितली पाहिजे, असेही देशपांडे यावेळी म्हणाले.

Share