नवी मुंबई : राज्यातील ओबीसी समाजाने काही दिवसांपुर्वीच एक मोठी लढाई यथस्वीपणे लढली आणि विजय मिळवला. आपल्या हक्काच असलेले राजकीय आरक्षण गेले होते. मात्र ते पुर्ववत करण्यास आपल्या यथ आले आणि राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसींना न्याय मिळाला.आपली लढाई ही इथेच संपत नाही. आपल्याला अजुन लढायच आहे.काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच आरक्षण कमी झालं आहे.ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम रहायला हवं यासाठी आपला लढा सुरुच राहणार असून सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येऊन हा लढ्यात सहभागी व्हावे,असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
विष्णुदास भावे नाट्यगृह नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश व अखिल भारतीय महात्मा फ़ुले समता परिषद यांच्या वतीने कृतज्ञता सोहळा पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. राममनोहर लोहीया म्हणायचे ‘सड़कें खामोश हो गई तो संसद आवारा हो जाएगी’ त्यामुळे आपण शांत राहीलो तर आपल्या हक्काच्या गोष्टीसुद्धा हे लोक हिरावुन घेतील. त्यामुळे आपल्याला आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे, बहुजन समाजाचे प्रबोधन केलेच पाहीजे. काही वर्षांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही सर्व अतिशय व्यथित झालेलो होतो. हे आरक्षण पूर्ववत होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि विविध ओबीसी संघटनांनी वेळोवेळी अनेकदा आंदोलने केली. त्या सर्वांचे हे सामुहिक यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, ज्या बांठिया आयोगाच्या अहवालामुळे आपले राजकीय आरक्षण पुर्ववत झाले त्यात अनेक त्रुटी आहे. अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने उपाय योजना करायला हव्यात. केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आपली सुरवाती पासूनची मागणी आहे मात्र केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी अशी आपली आग्रही मागणी राहणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील ओबीसी सध्या भरडला जात आहे त्यामुळे ओबीसी घटकाला देखील एससी आणि एसटी प्रमाणे घटनात्मक आरक्षण मिळालेच पाहीजे.
महापुरुषांचे विचार रुजवा
आपली लढाई अजून संपली नाही.आताशी सुरु झाली आहे. ‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन,अभी तोलना आसमान बाकी है’ असे सांगत आत्ता कुठे लढाईला सुरवात झाली असे समजा आणि पुन्हा नव्या दमाने लढा असे आवाहन त्यांनी उपस्थित बांधवाना केले. ते म्हणाले की, समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. महापुरुषांचे विचार आपल्याला समाजात पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात आपण गेले पाहीजे. फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या लोकांमागे आपण उभे राहिले पाहिजे. फुले- शाहू – आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.