शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबईतील कळंबोली येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबोली येथून ताब्यात घेतले. कळंबोली पोलिस ठाण्यात केतकीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला पोलिस ठाण्याबाहेर आणण्यात आले. केतकीला पोलिस गाडीत बसवत असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर शाईफेक केली. तसेच केतकी चितळे हाय हायच्या घोषणा दिल्या.

दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणारी पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली होती. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली होती.  ”तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.

केतकीच्या या पोस्टनंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. संपूर्ण राज्यातील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केतकीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी तिच्या अटकेची मागणीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केतकीच्या या पोस्टवर संतापजनक प्रतिक्रिया देत केतकी चितळेला खडे बोल सुनावले आणि अशा लोकांचा बंदोबस्त करावा, असे म्हटले. केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतळी चितळेचा निषेध केला आहे. या सगळ्यावर केतकी चितळे हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत केतकी चितळेच्या विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक केतकी चितळेचा शोध घेत होते. केतकी ही कळंबोली येथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबोली येथून केतकीला ताब्यात घेतले. कळंबोली पोलिस ठाण्यात केतकीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने तिला अटक केली आहे.

दरम्यान, केतकी चितळेला पोलिसांनी अटक केल्याबद्दल गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ठाणे पोलिसांचे आणि नवी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

 

 

 

Share