‘अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत’, पाटलांचा टोला

पुणे :राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि त्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आज पुण्यात चंद्रकात पाटील पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेजींनी म्हटलंय की राज्यपालांना थेट भेटणे हे घटनेत बसत नाही. अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला लागतंय, असे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील भाजपचे नेते काही ना काही कारणांवरून राज्यपालांना भेटत असतात. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला होता. राज्यपालांचे घर हे भाजप नेत्यांचा अड्डा झाला आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंने केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. प्रताप सरनाईकांच्या प्रकरणात आम्ही राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अरे.. तुझे बाबा म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री भाजपच्या अध्यक्षालाही भेटायला तयार नाहीत. राज्याचे सर्वाधिक घटनात्मक पद राज्यपाल आहे. तुम्ही उपलब्ध नसल्याने हे पाऊल उचलावे लागते, असे पाटील म्हणाले.

मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त एकदा पुण्यात आले आणि एकदा फोनवरुन उपलब्ध झाले. उद्धव ठाकरे फोनवरही उपलब्ध होत नाहीत. २७ तारखेनंतर त्यांचा माझा एकदा फोन आला नाही. वाढदिवसाला, कार्यक्रमांना कधी फोन त्यांनी घेतला नाही.  त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला तरी फोनवर उपलब्ध होत नाहीत, असे पाटील म्हणाले.

पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस संधी का सोडली. त्यावेळेस  ते उदार झाले होते का. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाच नाही तर संजय राऊत यांनाही पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे थैयथयाट होता. फ्रस्ट्रेशन व्यक्त करताना फोडेन, मारेन, तोडेन, सोडणार नाही वगैरे अशी भाषा वापरली जाते. उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे दसरा मेळाव्यातील भाषणासारखेच होते. आपल्या पक्षाचा ऱ्हास होतोय, आपले चुकलेय या जाणिवेतून आलेले हे फ्रस्ट्रेशन आहे, असे पाटील म्हणाले.

 

 

Share