ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय राहणार नाही…

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादेत १ मे रोजी घेतलेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज सकाळी नऊच्या सुमारास ट्विटरवरून पुन्हा एकदा आपली भोंग्यांविरोधातील भूमिका स्पष्ट करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय?
राज ठाकरेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नमाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद” असं म्हणताना दिसत आहेत.

https://twitter.com/RajThackeray/status/1521694002197975040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521694002197975040%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Floudspeaker-on-masjid-mns-chief-raj-thackeray-tweet-video-of-balasaheb-thackeray%2Farticleshow%2F91303209.cms

मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर सातत्याने आगपाखड सुरू आहे. राज ठाकरे हे समाजात जातीय तेढ पसरवत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडीओ ट्विट केला असावा का, याची चर्चा सुरू आहे.

Share