राणा दाम्पत्याला अखेर सशर्त जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अटी, शर्तींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला असून, १२ दिवसांनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका होणार आहे.

खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी २३ एप्रिलला ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्याला ‘मातोश्री’वर येण्यापासून रोखण्यासाठी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’बाहेर रात्रभर पहारा दिला होता. तसेच राणा दाम्पत्याचे निवासस्थान असलेल्या खारमधील इमारतीलाही शिवसैनिकांनी वेढा घातला होता. त्यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. या दोघांवर राजद्रोहाचे कलम (१२४ अ), ३५३ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

राणा दाम्पत्याने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या दोन एफआयआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, राणा दाम्पत्याची याचिका फेटाळून लावत मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. राणा दाम्पत्याच्या जामीन याचिकेवर शनिवारी (३० एप्रिल) सुनावणी पार पडली होती. यावेळी सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. सोमवारी (२ मे) युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सत्र न्‍यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज बुधवारी (४ मे) सत्र न्‍यायालयाने राणा दाम्‍पत्‍याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालत विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदार देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. पोलिसांना याप्रकरणी आरोपींची चौकशी करायची असेल तर २४ तासांची आगाऊ नोटीस द्यावी, असेही न्यायाधीशांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत कायदेशीर सोपस्कार पार पडून खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.

खा. नवनीत राणा जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खा. नवनीत राणा यांची आज सकाळी पुन्हा तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना भायखळा तुरुंगातून जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार राणा यांना स्पाँडिलिसिसचा त्रास आहे. कारागृहामध्ये फरशीवर झोपल्यामुळे त्यांचा हा त्रास वाढला आहे, असे पत्र त्‍यांच्‍या वकिलांनी कारागृह प्रशासनाला दिले आहे. त्यानुसार आज त्‍यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share