राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षांकडून उमेदवारी

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून सुरू असलेला उमेदवारांचा शोध आता थांबला आहे. शरद पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा उमेदवार होण्यास नकार दर्शवल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारी यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार असून, यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आज नवी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली. विरोधी पक्षांतील नेत्यांच्या चर्चेनंतर यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रपती पदासाठी एकमताने उमेदवार निवडला आहे. नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी आम्ही यशवंत सिन्हा यांना सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला आहे. सर्व पक्षांनी यशवंत सिन्हा यांना मतदान करावे, असे आवाहन जयराम रमेश यांनी केले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांची आघाडी यापुढेही कायम असेल, असे त्यांनी म्हटले आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी. राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, सीताराम येचुरी, एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) यांच्यासह अभिषेक बॅनर्जी, राम गोपाल यादव आणि खा. असदुरुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

शरद पवार, गोपाळकृष्ण गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांचा नकार
विरोधी पक्षांनी यापूर्वी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सुचवले होते; पण हा प्रस्ताव शरद पवार यांनी नाकारला होता. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, या दोघांनीही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने आता यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने एनडीएच्या वतीने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. लवकरच भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.

यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नाव जाहीर होण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यशवंत सिन्हा यांनी यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले होते. आता विरोधी पक्षांनी त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संधी दिली आहे.

यशवंत सिन्हा यांची राजकीय कारकीर्द
यशवंत सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. १९८४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जनता दलामध्ये प्रवेश केला. १९८८ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ११९३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे सरकार गेल्यानंतर २००५ पासून भाजपमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यशवंत सिन्हा हे तीन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात यशवंत सिन्हा वित्तमंत्री होते. २०१८ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजप सोडली. पुढे त्यांनी राष्ट्रमंच संघटनेची स्थापना केली. सिन्हा यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Share