राजकारण नव्हे तर देशवासियांची सेवा हा आपला ध्यास : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : राजकारण नव्हे, तर देशवासियांची सेवा हाच आपला ध्यास आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी (दि.१२) गुजरातमधील भरुच येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष समारंभात बोलताना केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, जेव्हा सरकार इमानदारीने आणि एक संकल्प घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याचे किती सार्थक परिणाम मिळतात, याचे उदाहरण म्हणून उत्कर्ष समारंभाकडे पाहता येईल. अनेकदा माहितीअभावी लोक योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात, तर कधी-कधी योजना कागदावरच राहतात; पण नीती-नियत, उद्देश स्वच्छ असेल आणि काम करण्याची इच्छा असेल, तर चांगले परिणाम आल्यावाचून राहत नाहीत. अर्थात यासाठी ‘सबका साथ-सबका विकास’ ही भावना देखील मनात असणे आवश्यक असते. केंद्रातील मागची आठ वर्षे सुशासन आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित राहिलेली आहेत.

२०१४ साली जेव्हा आपण केंद्रात सत्तेत आलो, तेव्हा देशातील जवळपास निम्म्या लोकांकडे शौचालयाची सुविधा नव्हती. लसीकरण, विजेची जोडणी, बँक खाती आदी बाबतीत देश मागे होता. मात्र, गेल्या आठ वर्षात वरील प्रगती साध्य झाली आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी यांनी नमूद केले. आपण राजकारण करण्यासाठी नव्हे तर देशसेवेसाठी आलो आहोत, त्यामुळे कठीणातील कठीण योजनेला हात घालण्याची भीती वाटत नाही, असेही मोदी म्हणाले.

Share