योगीचा मोठा निर्णय ; मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता उत्तरप्रदेशात सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमधील मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

२४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मदरशा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ९ मे रोजी याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी गायल्या जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेबरोबरच राष्ट्रगीत (जन-गण-मन) देखील गायले जाणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी  सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिका-यांना याबाबत आदेश जारी केला आहे. पांडे यांनी आदेशात म्हटले आहे की, २४ मार्च रोजी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्राथनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे.

मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजाननिमित्त उत्तर प्रदेशातील मदरशांना ३० मार्च ते ११ मे या कालावधीत सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. आज गुरुवार (१२ मे) पासून मदरसे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर पहिल्याच दिवसांपासून म्हणजेच आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांना लागू असेल, असेही संबंधित आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश मदरशा बोर्डाने स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण अनिवार्य केले होते. या आदेशानंतर जवळपास पाच वर्षांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी धार्मिक प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत (जन-गण-मन) म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान, युपीचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री धरमपाल सिंह यांनी मागील महिन्यात मदरशांमध्ये राष्ट्रवाद शिकवण्यावर भर दिला होता. तर राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनीही म्हटले होते की, मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे.

Share