मुंबई : देशाच्या नवीन राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तसेच विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज्यसभेची निवडणूक संपताच आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक भाजपसाठी सोपी जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दुसरीकडे भाजप विरोधकदेखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. तशी तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या १५ जून रोजी भाजप विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी यांची भूमिका
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी नेत्यांशी संपर्क साधला आहे. या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी अन्य नेत्यांसोबत समन्वय साधण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिली आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी कोरोनातून बरे होईपर्यंत मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
राज्यघटना, लोकशाही संस्था आणि नागरिकांचे सत्ताधारी पक्षाच्या हल्ल्यापासून संरक्षण करू शकेल अशा राष्ट्रपतीची देशाला गरज आहे, असे काँग्रेसचे मत आहे. असा राष्ट्रपती निवडला पाहिजे जो भारताची तुटलेली सामाजिक बांधणी एकत्र करण्याचे काम करेल आणि लोकांच्या वेदना दूर करेल. ही भावना लक्षात घेऊनच चर्चा आणि विचारमंथन खुल्या मनाने व्हायला हवे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल तर….
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यापूर्वी शरद पवारांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली असताना आता त्यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी समोर येत आहे. आज पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत भाष्य केले आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकासाठी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला असता, “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.
असा आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जून रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. ३० जूनपर्यंत अर्जाची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जुलै आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. यावेळी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार की, सर्वसंमतीने नवीन राष्ट्रपतीची निवड होणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे.