भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचे योगदान : राऊत

मुंबईः देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांचे काल निकाल जाहीर झाले आहे. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपू या राज्यात भाजपाने झेंडा फडकवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाचा मोठा पराभव केला. तर शिवसेनेला उत्तर प्रदेश , गोवा आणि मणिपूर मध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होते, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरुन १२५ वर पोहोचला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचे योगदान आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. लोकशाहीत विजय-पराभव होत असतो. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये भाजपाचा विजय झाल्याचे आम्हाला दु:ख होण्याचे कारण नाही. तुमच्या आनंदात आम्हीदेखील सहभागी आहोत, असे संजय राऊतांनी सांगितले.

पुढे म्हणाले की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हारले, गोव्यात दोन उपमुख्यमंत्री हारले. पण पंजाब सर्वात चिंतेचा विषय आहे. पंजाबसारख्या सीमावर्ती भागात तेथील लोकांनी राष्ट्रीय आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष भाजपाला पूर्णपणे नाकारलं. प्रधानमंत्री, गृहमंत्री, रक्षामंत्री सर्वांनी झोकून प्रचार केला तरी ते का हारले? उत्तर प्रदेश तर तुमचंचं होतं, उत्तराखंडही तुमचंच होतं, गोवाही तुमचं होतं. उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळाल्या म्हणून आम्हाला बोलत आहात ना. तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला आहे त्यापेक्षा मोठा पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे. त्याबद्दल देशाला मार्गदर्शन करा,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Share