राणांनी कर्ज घेतलेल्या युसूफ लकडावालांसोबत शरद पवारांचा फोटो

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान, राऊतांच्या या आरोपानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युसूफ लकडावालासोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ समोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वादानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवनीत राणांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ‘ईडी’ने अटक केलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप खा. राऊत यांनी केला होता. याबाबतची कागदपत्रेही त्यांनी ट्वीटसोबत शेअर केले होते. त्याला भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. युसूफ लकडावाला हे मुंबईचे मोठे बिल्डर होते. त्यांच्या मृत्यूनंतर संजय राऊतांनी त्यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले. मृत्यूनंतर त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत, असे मोहित कंबोज म्हणाले.

लकडावालांचे ठाकरे, पवार, गांधी सर्वांशीच संबंध
युसूफ लकडावाला हे मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर होते. राजीव गांधी त्यांच्या घरी येत असत. शरद पवारांशीही त्यांची भेट होत होती, असे म्हणत मोहित कंबोज यांनी तसे फोटोच ट्विटरवर शेअर केले आहेत. मोहित कंबोज यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दोन-तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोत निळा कोट परिधान केलेला युसूफ लकडावाला असून, त्याच्या बाजूला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असा दावा कंबोज यांनी केला आहे. याशिवाय युसूफ लकडावाला याचे उद्धव ठाकरे, दिवंगत विलासराव देशमुख यांच्याशीही संबंध होते. हे सर्व नेते युसूफ लकडावालांना ओळखत होते. मात्र, नंतर काही काळ मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावे लागले, असे कंबोज यांनी सांगितले.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1519224385910976512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519224385910976512%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmumbai%2Fmohit-kamboj-share-photo-of-sharad-pawar-with-yusuf-lakdawala-npk83

नवनीत राणांनी लकडावालांकडून घर विकत घेतले
नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून खार येथील घर विकत घेतले आहे. यासंबंधी त्यांच्यात व्यवहार झाला होता. त्याचेच कागदपत्रे आता संजय राऊतांकडून जाहीर केले जात आहेत. मात्र, यात गैर काहीही नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी संजय राऊतांकडून असे आरोप केले जात आहे, अशी टीका मोहित कंबोज यांनी केली. तसेच संजय राऊत यांनीदेखील युसूफ लकडावालाकडून पैसे घेतले आहेत. त्यांनी माझ्याकडूनही पैसे घेतले आहेत. मात्र, अद्याप ते परत दिलेले नाहीत. संजय राऊतांना फक्त वसुली जमते. पैसे परत करणे त्यांना माहीत नाही, अशी टीकाही मोहित कंबोज यांनी केली.

लकडावालांच्या हॉटेलात संजय राऊतांचा मुक्काम
युसुफ लकडावाला यांचे महाबळेश्वरमध्ये हॉटेल आहे. महाबळेश्वरला गेल्यानंतर संजय राऊत किती तरी वेळेस या हॉटेलमध्ये थांबले आहेत. तेव्हा त्यांना लकडावालांचे दाऊद इब्राहिमसोबत असलेले संबंध दिसले नाही का, असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच लकडावालांचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहे की नाही माहिती नाही; पण कॅबिनेट मंत्रिमंडळातील अनेक नेते हे दाऊदचे हस्तक आहेत. त्यातीलच एक नवाब मलिक आता तुरुंगात गेले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी याविषयी न बोललेले बरे, असे मोहित कंबोज म्हणाले.

Share