खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे पुन्हा कानावर येता कामा नये; मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील काजूपाडा परिसरात काल एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला. खड्ड्यामुळे तोल गेल्याने दुचाकीस्वार कोसळला आणि मागून येणाऱ्या एसटी बसने त्याला चिरडले. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचे पुन्हा माझ्या कानावर येता कामा नये, अशी सक्त ताकीद शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे.

काल घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती व्हायला नको. यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही रस्त्यावर खड्डा दिसता कामा नये. यासाठी रेडिमिक्स वापरा, नाही तर कोल्डमिक्स वापरा. मात्र, खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याचे पुन्हा माझ्या कानावर येता कामा नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश
सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातदेखील गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. याचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांवर लक्ष केंद्रित करत रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी रेल्वे, बसेस, पाणी, वीजपुरवठा अशा विविध विषयांवर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ठाणे जिल्हा आणि शहराशी निगडित विविध यंत्रणांचे, विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाऊन काम केले तर चांगल्या प्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पावसाळा सुरू झाला आहे. तेव्हा रस्त्यांवरील खड्डे लक्षपूर्वक भरा. खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणीही जखमी होऊ नये याची दक्षता घ्या. कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा. पूर परिस्थितीवर लक्ष ठेवा. पूर येणाऱ्या भागात जीवितहानी होऊ नये याची दक्षता घ्या. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवा आणि आवश्यकता पडल्यास वेळेत हलवण्यात यावे. धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असेल तर गेट उघडण्याबाबत तसेच बंद करण्याबाबत पूर्वकल्पना द्या. धरणावरील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तसेच काही भागात दरड कोसळण्याची शक्यता आहे. अशा भागातील लोकांना सावध राहण्याच्या सूचना द्या. सुरक्षित स्थळी लोकांची जी व्यवस्था करायची ती चांगलीच करा. राहण्याची-जेवणाची चांगली व्यवस्था करा. रेल्वे प्रशासनाबरोबरही चांगला समन्वय ठेवा. तिन्ही धरणाच्या क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवा. ज्या गावांचे स्थलांतर रखडले आहे ते तातडीने करा. विशेषतः सावळसे गावाला जागाही दिली आहे. या गावाबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पावसाचा जोर वाढत असून आपल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यास शासनाविषयी चांगली लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने लावल्यास चांगले काम होते. मी राज्याचा जनसेवक म्हणून काम करतो आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहावे
कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू देऊ नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

Share