श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये काही काळ शांतता प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी घटना वाढल्या आहेत. गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी आज शुक्रवारी पोलिस कॉन्स्टेबल (एसपीओ) रियाझ अहमद ठोकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये २४ तासांतील टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.
गुरुवारी दोन दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूरा परिसरातील सरकारी कार्यालयात घुसून काश्मिरी पंडिताची हत्या केली होती. बडगाममध्ये राजस्व विभागात राहुल भट (वय ३५) क्लर्क पदावर कार्यरत होते. दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. यानंतर आज शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिस हवालदार रियाझ अहमद ठोकर यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रियाज अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले;पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Injured Police Constable Reyaz Ahmad Thoker #succumbed to his injuries at hospital & attained #martyrdom. We pay rich #tributes to the #martyr & stand by his family at this critical juncture.@JmuKmrPolice https://t.co/SKKXWWd0hW
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 13, 2022
काश्मीर झोन पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. यात ‘जखमी पोलिस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आम्ही त्याच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. याप्रसंगी रियाझ याच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे.
काश्मीरमध्ये एका आठवड्यात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला हा दुसरा पोलिस कर्मचारी आहे. याआधी गेल्या शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून ठार केले होते.
श्रीनगर आणि बडगाममध्ये तणाव वाढला
दरम्यान, बडगाममध्ये काल गुरूवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली. यानंतर येथे राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करुन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट करत त्याच्याकडे मोर्चा वळविला आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्यावर शुक्रवारी सकाळी बंतलाब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मूचे एडीजीपी मुकेश सिंह, विभागीय आयुक्त रमेश कुमार, उपायुक्त अवनी लवासा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर श्रीनगर आणि बडगाममध्ये तणाव वाढला आहे. बडगाममध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
सुब्रह्मण्यम स्वामी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर
काश्मीरमधील दहशतवादी अनेक महिन्यांपासून काश्मिरी पंडितांवर हल्ले करत आहेत. गुरुवारी पुन्हा अशीच घटना घडली. या प्रकरणी भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. इस्लामी दहशतवाद्यांनी राहुल भटची हत्या केली. ही घटना गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र, मोदी सरकार तसं करताना दिसत नाहीये. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरण्याचा काय फायदा जेव्हा सरकारच डरपोक आहे आणि या हल्ल्याचे उत्तर देत नसेल. पंतप्रधान मोदी फक्त जम्मूमध्ये जातात. त्यांनी तातडीने श्रीनगरमध्ये जायला हवं, असे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
The murder of Rahul Bhat by Muslim extremists cannot be taken casually as Modi Govt is doing. What is the use of talking of Hindutva when the Govt is a sissy and cannot retaliate. Why did Modi go only to Jammu? He must now immediately go to Srinagar.
— Subramanian Swamy (@Swamy39) May 13, 2022